महाराष्ट्र

शपथविधीची जंगी तयारी, २२ राज्यांचे मुख्यमंत्री येणार,संत महंतांना स्वतंत्र व्यासपीठ

राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंगळवारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होऊन देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड औपचारिकता मानली जात आहे. दुसरीकडे दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानावर बहुप्रतिक्षित आणि उत्सुकता ताणल्या गेलेल्या शपथविधीची तयारी भाजपकडून सुरू आहे.

महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास ४० हजार जणांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे.तसेच देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

शपथविधीसाठी तीन मोठ्या मंचांची (स्टेज) उभारणी करण्यात येत आहे. एक मुख्य मंच (स्टेज) आणि त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी मुख्य मंचावर शपथविधीचा कार्यक्रम होईल तर दुसऱ्या मंचावर साधू महंतांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तिसऱ्या मंचावर संगीत सोहळा होणार आहे.

शपथविधीसाठी जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय करण्यात आली आहे. १३ विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खासदार आणि आमदारांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती कळत आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची देखील आसन व्यवस्था वेगळी असणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याची आकडेवारी समोर आली आहे. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने त्यांचे सख्खे भाऊ सत्तेत आले आणि सावत्र भाऊ सत्तेपासून दूर राहिले, असे भाजप नेते सांगत आहेत. लाडक्या बहिणींचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन महायुती सरकारच्या शपथविधीला निमंत्रित बहिणींना बोलाविण्यात येणार असल्याची माहिती कळते आहे.

शपथविधीसाठी एकूण ३ स्टेज असणार
-मुख्य मंच ६० बाय १०० फुट
-उजव्या आणि डाव्या बाजुला ६० बाय ५० चे दोन मंच
-उजव्या बाजपुच्या मंचावर संत – महंत , सन्मानीय व्यक्ती
-डाव्या बाजुला महापुरुषांच्या प्रतिमा – सांस्कृतिक कार्यक्रम होतील
-३० ते ४० हजार आसनव्यवस्था
-मंचासमोर आमदार-खाषदार, निमंत्रीत, व्हीव्हीआयपी
-चोख पोलिस बंदोबस्त
-सर्वसामान्यांच्या प्रवेशाकरिता ३ प्रवेशद्वार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *