महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला;मुख्यमंत्री कोण?शिंदे की फडणवीस!
राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने सत्तेत आलं तरी मुख्यमंत्रिपदाचं आणि शपथविधीचं काही ठरत नव्हतं. या आधी शपथविधीच्या तारखा आणि ठिकाणांवर अनेकदा चर्चा झाल्या. पण आता शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यात सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपकडेच मुख्यमंत्रिपद जाणार हे आता निश्चित झालं आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. भाजपमधून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव अंतिम झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात 2 डिसेंबर रोजी भाजपची बैठक असून त्यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपद आणि नगरविकासमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. पण गृहमंत्रिपद हे शिंदेंना द्यायला भाजपने नकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, एकनाथ शिंदे शुक्रवारपासून साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यांच्यावर चार जणांचं पथक उपचार करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यादरम्यान जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दीपक केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. मात्र एकनाथ शिंदेंनी भेटण्यासाठी नकार दिला.
महाराष्ट्र राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही. ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती भाजप नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतील बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आला होता, मात्र अद्याप कोणत्याही नावाची घोषणा हाय कमांडकडून करण्यात आलेली नाही. दिल्ली येथील हाय कमांडकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच, पुन्हा एकदा शिंदे यांचे नाव चर्चेत आलं आहे.