अंबाजोगाईबीड

जिल्ह्याच्या विकासासाठी बजरंगला दिल्लीला पाठवा; भाजपला जागा दाखवा-शरद पवार यांनी जनतेला घातली साद


अंबाजोगाई:बीड जिल्ह्याचे चित्र बदलण्यासाठी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करुन देशात नवा इतिहास निर्माण करा, अशी साद घालत निवडणूकीच्या काळातील नरेंद्र मोदी यांची भाषणे हस्यास्पद आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील मोंढा मैदानावर झालेल्या विराट सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार बोलत होते. या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खा.रजनी पाटील, आ.संदीप क्षीरसागर, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार जयसिंग गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब पटेल, प्रा.सुशिला मोराळे, माजी आमदार फौजिया खान, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, बजरंग सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.राजेंद्र जगताप, आशाताई भिसे, बबन गित्ते, विजय गव्हाणे यांच्या सह इंडिया आघाडी घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना पवार म्हणाले, आजच्या सभेतील उत्साहाचे वातावरण पाहुन या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट दिसते. ही सभा बजरंग सोनवणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी आहे.या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या नंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीच्या कालावधीत केलेली भाषणे ही हास्यास्पद झाली आहेत. पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचे आणि एकात्मतेचे जे चित्र उभे करायला पाहिजे ते चित्र उभे करण्यात मोदी सपशेल अयशस्वी ठरले आहेत.ज्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आवश्यक नाहीत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात करुन त्यांनी आपले हसू करुन घेतले आहे.देशाच्या राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांनी राजकीय आसुयेपोटी तुरुंगात टाकले. देशात एकात्मिक भावना वाढीस लागण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडतो ही काढलेली पदयात्रा आपण विसरु शकत नाही. देशाच्या राजकारणात गांधी कुटुंबातील सदस्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणारे नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून गांधी कुटुंबातील सदस्यांवर केलेले आरोप हे घृणा निर्माण करणारे आहेत.देशा समोरील प्रश्न सोडविण्यासाठी आज भाजपाला सत्तेपासून दुर रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी येत्या १३ मे ला इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करुन देशात नवा इतिहास निर्माण करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.

००

कोण काय म्हणाले….

आ.जयंत पाटील:बजरंग सोनवणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा असून देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास सामान्य माणसांनी केला पाहिजे.

खा.रजनी पाटील:लोकसभेच्या या निवडणुकीत १९८० साली झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार. या निवडणुकीत इंडिया आघाडीचा गट फार मजबुतीने भाजपाच्या पराभवासाठी आणि बजरंगच्या विजयासाठी प्रयत्न करताहेत यांचा आनंद.

माजी मंत्री अनिल देशमुख:महत्वाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत मी मुद्दाम आलो आहे. विदर्भातील सर्व मतदार संघाच्या निवडणुकीत चमत्कार होणार आहे.महाराष्ट्रातील फुटाफुटीच्या राजकारणाला आता कंटाळली असून हे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे.

माजी मंत्री राजेश टोपे:अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक आणि पौराणिक इतिहास आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात जशी अंबाजोगाई शहरातुन झाली त्याच पध्दतीने भाजपा मुक्तीची सुरुवात अंबाजोगाई शहरात होत आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बजरंग सोनवणे:कमी बोलणार पण खरं बोलणार. समोरील पक्षाचे उमेदवार स्वत: ला खुप मोठं समजतात. आता जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख घालवण्यासाठी भाजपाचे उमेदवार आज मत मागताहेत. मागील १० वर्षे जिल्ह्यातील सत्ता असताना विकासाची गंगा का आणली नाही.

आ.संदीप क्षीरसागर:बीड जिल्ह्यातील गावागावात बजरंग सोनवणे यांचे वारे वाहत आहे. हनुमानाने जशी लंका जाळून टाकली तशी बजरंग सोनवणे भाजपाची ही लंका जाळून टाकतील. मतदार संघात जातीय राजकारणाची अफवा पसरवली जात असली याचा भाजपला उपयोग होणार नाही.

ॲड.अजय बुरांडे:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पदाधिकारी म्हणून म्हणून आम्ही सर्व जण भाजापाच्या विरोधातील लढाईत आम्ही सहभागी आहोत. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाचा तक्त या निवडणुकीत हलणार यांचे संकेत मिळत असल्याने नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

सुनील धांडे:शिवसेना उबाठा पक्षासोबत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकविण्यासाठीची ही निवडणूक आहे. बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांना धडा शिकविण्यासाठी बजरंग सोनवणे यांना विजयी करा.

पृथ्वीराज साठे:केंद्र आणि राज्यसरकार ज्या घोषणा या पाच वर्षांत केल्या त्या घोषणांची पुर्तता केली नाही. लोकांची फसवणूक करणाऱ्या या शासनाला धडा देण्यासाठी या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना विजयी करा असे आवाहन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *