महाराष्ट्रमुंबई

राज्यात 50 हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू;पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक नेमणार

राज्यात शिक्षण भरतीचा आजच जीआर काढणार असून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

तर राज्यात एकूण 50 शिक्षकांची भरती होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचं काम रखडलं होतं असं मंत्री दीपक केसकरांनी सांगितलं आहे.

मंत्री दीपक केसरकरांनी काय म्हटलं?

‘आम्ही भरतीची प्रतिक्रिया सुरु केली होती. परंतु औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने कोणतीच प्रक्रिया करता येत नव्हती’, असं दीपक केसकर यांनी म्हटलं. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘आता हायकोर्टाने त्यांची स्थगिती उठवली आहे, त्यामुळे शिक्षक भरतीचे परिपत्रक (GR) आजच काढण्यात येणार आहे.’

राज्यात करण्यात येणारी शिक्षक भरती ही दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

दरम्यान परवानगी मिळाल्यास 100 टक्के शिक्षक भरती करु असं देखील दीपक केसरकरांनी म्हटलं होतं. पण त्यानंतर शिक्षक भरतीला कोणताही वेग आला नाही. मात्र आता केलेल्या घोषणेनंतर राज्यात लवकरच शिक्षण भरतीचा प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रक्रियेला अजून महिनाभर लागेल असं देखील केसरकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजूनही राज्यात शिक्षक रुजू होण्यासाठी जवळपास महिनाभराचा अवधी असल्याचं यावरुन स्पष्ट झालं आहे.

राज्यात शिक्षण व्यवस्थेचा दर्जा घसरल्यानंतर राज्यातील शिक्षकांची संख्या हे महत्त्वपूर्ण कारण देण्यात आलं होतं. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्यांच्यावर अधिकचा भार येत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती होणं हे महत्वाचं मानलं जात आहे.

राज्यात शिंदे – फडणवीसांचं सरकार आल्यानंतर शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक भऱती करण्यात येईल असं देखील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं. तसेच आधार वेरिफिकेशनचं काम झाल्यानंतर राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ताबडतोब भरती करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात शिक्षक भरतीसाठी कोणतीही हालचाल होत नसल्याचं चित्र होतं. पण आता करण्यात आलेल्या घोषणेनंतर आता तरी या शिक्षक भरतीला वेग येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *