पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून तुरळक अपवाद वगळता मुंबईसह राज्यात दमदार पाऊस पडत आहे. यंदा राज्यात मान्सून तब्बल १५ दिवस उशीराने दाखल झाला. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने ही कसर भरून निघाली आहे. परंतु, राज्यात अद्याप शेतांमध्ये पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या होसाळीकर यांनी राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असून २ जुलै पासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत व संलग्न भागावर होण्याची शक्यता. राज्यातही ४ आणि ५ या दिवशी त्याचा प्रभाव राहील, अस होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जुलै महिन्याचे पहिले पाच दिवस मुसळधार पावसाचे असण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई आणि उपनगराच्या परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. पावसाची रिपरिप सुरु असून अधुनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत व तीव्र सरी आताही चालू आहे. सुरक्षितपणे प्रवास करा व सखल भागात पाणी साचल्यास काळजी घ्या. माहीत असलेल्या भागातूनच चालत जा, असेही होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी दमदार पाऊस कोसळेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.