नवीन संसदभवन १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब-पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर नव्या लोकसभेतून संबोधित केलं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिंवश उपस्थित होते. प्रत्येक देशाच्या विकासाच्या यात्रेत काही क्षण येतात ते अमर होतात. काही तारखा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवल्या जातात, तसा क्षण आजचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आपला देश स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानिमित्त अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताच्या लोकांनी लोकशाहीला या निमित्तानं संसदेची भेट दिली आहे. आज सकाळी ससंदेच्या प्रांगणात सर्वधर्मीय प्रार्थना झाली आहे. सर्व देशवासियांना या सुवर्ण क्षणांच्या शुभेच्छा देतोय, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे फक्त भवन नाही, १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. जगाला भारताच्या दृढनिश्चयाचा संदेश देणारं आमच्या लोकशाहीचं मंदिर आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. हे नवं संसद भवन संकल्पाला सिद्धीला जोडणारं महत्त्वाचं दुवा ठरेल. नवं संसद भवन स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नांना साकार करण्याचं माध्यम बनेल. हे नवं संसदभवन आत्मनिर्भर भारताची पहाट पाहिलं. हे नवं भवन जुन्या आणि नव्याच्या अस्तित्वाचा साक्षीदार बनेल, असं मोदींनी सांगितलं.
नरेंद्र मोदींनी नव्या वाटेवर चालून नवं ध्येय गाठलं जातं. नवा भारत नव्या वाटा शोधत आहे, असं म्हटलं. संकल्प नवा आहे, विश्वास नवा आहे. आज पुन्हा एकदा संपूर्ण जग भारताच्या संकल्पाच्या दृढतेला, भारतीय जनशक्तीच्या सृजनशक्तीला आदरानं पाहतं आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. जेव्हा भारत प्रगती करेल तेव्हा जग प्रगती करेल. संसदेचं नवं भवन भारताच्या विकासासोबत जगाच्या विकासाचं आव्हान करेल, असं मोदी म्हणाले.
आज ऐतिहासिक क्षणी संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना झाली आहे. महान चोल साम्राज्यात सेंगोलला कर्तव्यपथ, सेवा पथ, राष्ट्र पथाचे प्रतिक मानलं जातं. हा सेंगोल सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक बनला होता, असं मोदी म्हणाले. तामिळनाडूतून आलेल्या आदिनम संतांना अभिवादन करतो, असं मोदी म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वी याच्या इतिहासाबद्दल माहिती समोर आलेली आहे. सेंगोलला त्याची प्रतिष्ठा पुन्हा देऊ शकलो याचा आनंद आहे. लोकसभेचं काम सुरु असेल तेव्हा सेंगोल प्रेरणा देत राहील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत लोकशाही देश नाहीतर लोकशाहीची जननी देखील आहे. भारत आज जागतिक लोकशाहीचा मोठा आधार आहे. लोकशाही आमच्यासाठी व्यवस्था नसून संस्कार आहे, विचार आहे, परंपरा आहे, असं मोदी म्हणाले. आमचे वेद आम्हाला लोकशाही आदर्श शिकवतात. महाभारतात गण आणि गणतंत्राचा उल्लेख मिळतो. भगवान बसवेश्वरांच्या अनुभवमंडप आदर्श मानला आहे, असं मोदी म्हणाले. तामिळनाडूतील शिलालेख देखील तेच सांगतो. आपलं संविधान हाच आपला संकल्प आहे. संसद देशाच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचा सन्मान करते, असं मोदींनी सांगितलं.
नव्या संसदभवनात वारसा आहे, कला कौशल्य आहे, संस्कृती आहे आणि संविधानाचे संस्कार देखील आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनासाठी राजस्थानातून ग्रेनाईट, महाराष्ट्रातून लाकूड आणलंय, या संसद भवनातून एक भारत श्रेष्ठ भारताचं दर्शन होईल, असं मोदींनी सांगितलं. संसदेच्या जुन्या भवनात सर्वांसाठी आपल्या कामांना पूर्ण करणं अडचणीचं झालं होतं. तंत्रज्ञानाच्या समस्या, बैठक व्यवस्थेची अडचण होती. गेल्या दोन दशकांपासून नव्या संसद भवनाची चर्चा होती. भविष्यात खासदारांची संख्या वाढणार होती, ते कुठं बसले असते त्यामुळं नव्या संसद भवनाची निर्मिती केली आहे, असं मोदींनी म्हटलं.