दहावी परिक्षेचा निकाल रखडणार ?


मुंबई

करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद ठेवण्यात आली आहेत. परिणामी दहावीच्या काही विषयांच्या उत्तरपत्रिका शाळांच्या ताब्यात असून परीक्षक आणि नियामक यांना अद्याप मिळालेल्या नाहीत. यामुळे पेपर तपासणीचे काम अपूर्ण असल्याने याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यातच मुंबई विभागीय मंडळाने मुख्याध्यापकांना उत्तरपत्रिका तातडीने परीक्षक आणि नियामक यांच्याकडे तपासणीसाठी द्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.
राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असताना करोना विषाणूचा फैलाव वेगाने होऊ लागला. त्यामुळे राज्य सरकारने दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात तो पेपर रद्द केला. तर बारावीची परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र लॉकडाऊनमुळे शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम बंद झाले होते. त्यावर शिक्षण विभागाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-कॉलेजांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. शाळा कॉलेजांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक करोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अद्याप दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका शाळा, ज्युनिअर कॉलेजांत अडकून पडल्या आहेत. परीक्षकांनी पेपर तपासले असून ते नियामकांकडे अद्याप तपासणीसाठी पोचलेले नाहीत. त्यामुळे निकालावर विपरित परिणाम होण्याची भीती मुंबई विभागीय मंडळाने व्यक्त केली आहे. मंडळाने मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवून उत्तरपत्रिका तातडीने तपासणीसाठी देण्याची सूचना केली आहे. दरम्यान, दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका यंदा मुख्य नियामकांकडे पेपर तपासणीसाठी पाठवू नयेत अशी मागणी राज्य मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी केली आहे. तीन टप्प्यात तपासण्यात येतात. उत्तरपत्रिका प्रथम परीक्षकांकडे तपासली जाते. त्यानंतर ती नियामकाकडे तपासली जाते. ९० टक्केहून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका मुख्य नियामक यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात येते. यंदा करोनामुळे पेपर तपासणीस वेळ लागला आहे. पेपर मुख्य नियामकांकडे तपासणीसाठी पाठवल्यास निकाल जाहीर करण्यास अधिक विलंब होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!