महाराष्ट्र

एसआरपीएफच्या जवानांना करोनाची लागण;औरंगाबादमध्ये ९० नवे करोना रुग्ण

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून वाढणारी करोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीत. आज औरंगाबादमध्ये ९० नवे करोना रुग्ण सापडले आहेत. चिंतेची बाब म्हणजे या नव्या बाधितांमध्ये एसआरपीएफचे जवान सर्वाधिक असल्याचं आढळून आलं आहे. हिंगोलीपाठोपाठ औरंगाबादमध्येही एसआरपीएफच्या जवानांना करोनाची लागण झाल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे.

औरंगाबादमध्ये आज ९० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ४६८वर गेली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण आजारातून मुक्त झाले आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये एसआरपीएफ कॅम्प ७२, जयभीम नगर ४, बेगमपुरा ४, भीमनगर, भावसिंगपुरा, शाह बाजार, ध्यान नगर, गारखेडा, एन-२ लघू वदन कॉलनी, मुकुंदवाडी, कटकट गेट आणि सिकंदर पार्क येथे प्रत्येकी एक आणि बायजीपुरा येथील ३ रुग्ण आहेत. तर खुलताबाद येथे एक बाधित आढळून आला आहे. यामध्ये ८३ पुरुष व सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. औरंगाबादमधून मालेगावला ड्युटीसाठी एसआरपीएफचे १०६ जवान गेले होते. ड्युटी संपवून औरंगाबादला आलेल्या या जवानांची करोना चाचणी केल्यानंतर यातील बहुतेकांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. मालेगाव शहर करोनाचं हॉटस्पॉट होतं. त्यामुळे या जवानांना तिथेच करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं.दरम्यान, या जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. मालेगावहून आल्यानंतर हे जवान कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची यादी तयार केली जात असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांनाही क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे. तसेच हे जवान आणि आज सापडलेले करोना रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *