राज्यातील शाळा 1 जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार
पुणे– नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? शाळा कशा भरणार? मुलांना प्रत्यक्ष शाळेत जावं लागणार की ऑनलाइन वर्ग भरणार? असे अनेक प्रश्न पालकांना पडले असताना त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन राज्यातील शाळा 1 जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.
या निर्णयामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहेत. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यात शाळा, कॉलेजदेखील पुढच्या महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.