दमदार फलंदाजी भारताचा विजय:जडेजा आणि पंड्या यांची दमदार फलंदाजी
दुबई : भारताने १० महिन्यानंतर झालेल्या त्याच मैदानातील सामन्यात भारताने पराभवाचा बदला घेतला. पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा मोक्याच्या क्षणी बाद झाले. पण त्यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली नाही. कारण डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलमावीर लोकेश राहुल बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी खेळपट्टीवर होती. पण रोहितला या सामन्यात लय सापडल्याचे पाहायला मिळाले नाही. कारण रोहित धावा जमवण्यासाठी झगडत होता. पण त्याचवेळी विराट आक्रमक खेळ करत होता. पण थोड्यावेळात स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने मोठे फटके खेळायला सुरुवात केली. पण रोहितची ही फटकेबाजी अल्पायुषी ठरली. रोहितला यावेळी १८ चेंडूंत १२ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर कोहलीवरसंघाची जबाबदारी होती. पण काही चेंडूंमध्येच कोहलीनेही आपली विकेट आंदण दिली आणि त्यामुळे भारत अडचणीत सापडला. कोहलीने यावेळी ३४ चेंडूंत ३५ धावा केल्या.
रोहित आणि कोहली बाद झाल्यावर काही काळ रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी थोडाफार प्रतिकार केला खरा, पण सूर्यकुमार यावेळी १८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने आक्रमक सुरुवात केली. त्याला जडेजाही चांगली साथ देत होता.
पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला विकेट मिळाली. पण पाकिस्तानने रिव्हयू घेतला आणि अंपायरचा निर्णय बदलला. मोहम्मद रिझवान थोडक्यात वाचला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर कॅचसाठी भारताने रिव्ह्यू घेतला. पण विकेट मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार बाबर आझमला बाद केले, पाकिस्तान १ बाद १५; अर्शदीपने बाबरचा सोपा कॅच घेतला, बाबर फक्त १० धावांवर माघारी परतला.
सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेश खानने पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. त्याने फखर जमानची विकेट घेतली. आवेशने टाकलेल्या चेंडूने फखरच्या बॅटचा स्पर्श केला आणि विकेटकीपर दिनेश कार्तिकने एक सोपा कॅच पकडला. १३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने इफ्तिखार अहमदला २८ धावांवर बाद केले. बाउंसर चेंडूवर कार्तिकने सुपर कॅच घेतला. १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने मोहम्मद रिझवानची विकेट घेतली. रिझवानने हवेत मारलेला चेंडू आवेश खानने पकडला. १५व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिकने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. भुवनेश्वरने अखेरच्या षटकांमध्ये तीन विकेट्स काढल्या आणि भारताला घवघवीत यश मिळवून दिले.