महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला:पुढील आठवड्यात तापमान कमीची शक्यता
पुणे – उत्तरेकडील राज्यांत आलेल्या थंडीच परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून, राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात सोमवारी नागपूर येथे सर्वात नीचांकी म्हणजेच 7.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवडाभर राज्यात थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणा, चंढीगड तसेच गुजरात आणि राजस्थानातील काही भागांमध्ये थंडीची लाट आली आहे. या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. पुढील आठवडाभर राज्यात आकाश निरभ्र राहून तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.