ऑनलाइन वृत्तसेवा

ब्राह्मण समाजाने १० टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा: रामदास आठवले

ब्राह्मण समाजाने केंद्र सरकारच्या १० टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. “दलितांना आरक्षण मिळते मात्र आम्हाला आरक्षण मिळत नाही, अशी भावना ब्राह्मण, मराठा सवर्ण जातींमध्ये होती. त्या कारणानेही दलितांवर अत्याचार होत होते. त्यामुळे ब्राह्मण मराठा आणि सवर्णांमधील गरिबांना ज्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या आता आहे, अशा लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी मागणी मी सर्वात आधी केली होती. सर्वच ब्राह्मण श्रीमंत नाहीत. ब्राह्मणांमध्ये गरिबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी सर्व सवर्णांमधील गरिबांसाठी शिक्षण आणि नोकरी मध्ये १० टक्के सवर्णांना आरक्षण देणारा कायदा ३ वर्षांपूर्वी केला आहे. त्या कायद्याचा लाभ ब्राह्मण समाजातील गरिबांनी घ्यावा,” असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष ब्राह्मण समाजातील उमेदवारांना पाच जागांवर रिपाइंची उमेदवारी देणार असल्याची घोषणा यावेळी रामदास आठवले यांनी केली. “उत्तर प्रदेशातून ब्राम्हण आणि सर्व जातीचे लोक मुंबईत येऊन राहिले. मिळेल ते काम करून कष्ट करीत राहिले. त्यातील काही लोक व्यापारी बिल्डर उद्योजक आणि काही उच्च शिक्षित झाले. मात्र मध्यंतरी मुंबईत काही लोकांनी उत्तर प्रदेशातील लोकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा सर्वात आधी माझ्या रिपब्लिकन पक्षाने ‘ईट का जवाब पत्थरसे देंगे; असा प्रति ईशारा देऊन उत्तर प्रदेशातुन मुंबईत आलेल्या बांधवांना पाठिंबा दिला होता,” अशी आठवण रामदास आठवले यांनी सांगितली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशात कुठेही उद्योग धंदा नोकरी आणि वास्तव्य करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना दिला आहे. उत्तर प्रदेशातून आलेल्या ब्राम्हण आणि सर्व जातींना मुंबईत राहण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांना विरोध केला नाही. ब्राह्मण आणि सवर्ण समाजातील ज्या लोकांच्या मनात जातीभेदाचा विचार आहे तो विचार त्यांचे प्रबोधन करून नष्ट केला पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून आज ब्राम्हण समाजातर्फे सत्कार स्वीकारताना सर्व समाजात परिवर्तन होत असल्याचा विश्वास वाटत आहे. दलित सवर्ण ब्राम्हण यांतील सामाजिक भेदभाव मिटत आहे. समाजात एकोपा निर्माण होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता प्रस्थापित होईल, त्या दिशेने आपली वाटचाल असावी,” असे आवाहन त्यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *