ऑनलाइन वृत्तसेवा

आजपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार

१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आजपासून राज्यांना मोफत लस पुरवठा करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जनतेशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतातल्या लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळणं अपेक्षित आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या मोहिमेबद्दलची संपूर्ण माहिती…
नवीन लसीकरण मोहिमेबद्दल केंद्र सरकार काय म्हणालं?
महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांना केंद्र सरकारकडून मोफत लस मिळणार असल्याची ही घोषणा. पंतप्रधानांनी सांगितलं की, केंद्र सरकार ७५ टक्के लसी उत्पादकांकडून खरेदी करेल, त्याचबरोबर राज्यांच्या वाट्याच्या २ टक्के लसीही केंद्र सरकार खरेदी करेल आणि राज्यांना मोफत पुरवेल.
त्याचबरोबर खासगी रुग्णालये प्रति डोस १५० रुपये एवढंच शुल्क लसीकरणासाठी आकारु शकतात, असंही पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना मोफत लस मिळणार आहे. कोणत्याही राज्याला लसींसाठी खर्च करावा लागणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. ज्यांना मोफत लस नको असेल त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन घेतली तरी चालणार आहे, असंही ते म्हणाले.

लसीकरण मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये
सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये आजपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार आहे. याआधी केंद्र सरकार ४५ वर्षांवरील नागरिकांना आणि आरोग्य कर्मचारी तसंच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना मोफत लस देत होते.
आता केंद्र सरकार ७५ टक्के लसी उत्पादकांकडून खरेदी करेल, त्याचबरोबर राज्यांच्या वाट्याच्या २ टक्के लसीही केंद्र सरकार खरेदी करेल आणि राज्यांना मोफत पुरवेल. मात्र यापूर्वी केंद्र सरकार ५० टक्के लसी उत्पादकांकडून खरेदी करत होते आणि उरलेल्या ५० टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयं प्रत्येकी २५ टक्के अशा प्रमाणात खरेदी करत होते.


आता खासगी रुग्णालयांना लसीची किंमत ठरवून देण्यात आली आहे. या रकमेपेक्षा अधिक शुल्क खासगी रुग्णालयांना आकारता येणार नाही. खासगी रुग्णालयांमध्ये १५० रुपये प्रति डोस या किमतीने लसीकरण केलं जाईल.


राज्याची लोकसंख्या, करोनाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणाचा वेग याच्या आधारावर हा लस पुरवठा केला जाणार आहे.
लसीकरणासाठी कोविन अॅपची सक्ती आता रद्द करण्यात आली आहे. याऐवजी थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *