मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान मोदींची भेट
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मराठा आरक्षणाविषयी विनंती केली होती. त्यानंतर उद्याची ही भेट महत्त्वाची असणार आहे.
या पत्रामध्ये राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) म्हणून घोषित करण्यासाठी पावले उचलण्याबद्दल लिहण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात लिहलं होतं की, “5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटना खंडपीठाने (पाच न्यायाधीशांसह) दिलेल्या निकालामुळे मराठा आरक्षणासाठी तुम्हाला पत्र लिहण्याची संधी मिळाली. माझ्या राज्यात मराठा समाज कायद्यानुसार, किमान 12 टक्के शिक्षण आणि सार्वजनिक रोजगारात 13 टक्के आरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती पावले उचलायला हवीत.”
इतकंच नाहीतर, शिवसेनेचे मुखपत्र सामनातही मराठा आरक्षणाची लढाई दिल्लीतच लढविली जाईल, असं लिहण्यात आलं होतं. मराठा आरक्षणासाठी दिल्लीचा दरवाजा ठोठावणं आवश्यक आहे, असंही सामनातून लिहण्यात आलं होतं.
आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. यावर्षी ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने २०१८ मध्ये आणलेल्या मराठा समाजाच्या सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील आरक्षणाला रद्द केलं होतं.
न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, एस अब्दुल नजीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने मराठा समाजातील लोकांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून घोषित करता येणार नाही असं म्हटलं होतं