सलून चालक आंदोलनाच्या पावित्र्यात
पुुणे
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक व्यवसाय अर्थिक संकटात सापडले असून त्यामध्ये सलून व्यावसायिक आपला व्यवसाय वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे अर्थिक संकटात सापडल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण नाभिक समाज व सलून व्यावसायिक काम बंद आंदोलनाच्या पावित्र्यात आले आहेत.
गेली दोन महिने लॉकडाउनमुळे सर्वच बाजारपेठा बंद आहेत. याचा सर्वात जास्त फटका हा सलून व्यावसिकांना बसला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात ज्या दिवशी लाॅकडाउन शिथिल होईल त्या दिवशी सलून व्यावसायिक अधिक आक्रमक होतील, अशी माहिती महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली आहे. दोन महिन्याच्या लॉकडाउनच्या काळात सलून व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक दुकानदाराला 60 हजार रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर राज्यात बऱ्याच सलून व्यावसायिकांची दुकानंही 90 टक्के भाडेतत्वावर आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांचे 6 महिन्याचे भाडे माफ करण्यात यावे, असा आदेश सरकारने काढावा अशी मागणीही करण्यात आली. तसंच, महावितरणकडून 6 महिन्यांचे लाईट बिल माफ करण्यात यावे आणि केशकला बोर्ड ( अर्थिक विकास महामंडळ) चा अध्यक्ष निवडण्यात यावे आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही सोमनाथ काशिद यांनी केली आहे.