मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपले; आणखी काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे. आज मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात काही भागात गारांचा पाऊस झाला आहे त्यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळ या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्यानंही गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे.