बीड

बीडसह जिल्ह्यातील 6 नगर परिषद नगर पंचायत निवडणुकांसाठी 15 फेब्रुवारीला मतदार याद्या जाहीर होणार

मुंबई : राज्यातील 95 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच 31 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी दिली. या मतदार याद्यांवर 22 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.यात बीड जिल्ह्यातील बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी यांचा समावेश आहे

या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या याद्या प्रभागनिहाय केल्यानंतर 15 तारखेला प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील.

तर 1 मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 मार्चला प्रसिध्द होतील, असे मदान यांनी सांगितले.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करता येणार नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या नाव नसणे या दुरूस्त्या करण्यात येणार असल्याचेही मदान यांनी स्पष्ट केले.