यापुढे दुसरीपर्यंत गृहपाठ नाही:तर दप्तराचे ओझे मुलाच्या वजनापेक्षा 10%कमी राहणार
नवी दिल्ली: नव्या शिक्षण धोरणानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळांना अनेक सूचना केल्या आहेत. त्यानुसार दुसऱ्या इयत्तेपर्यंत गृहपाठ देऊ नये, शाळेत वजन मोजण्याचे डिजिटल यंत्र आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्केपेक्षा अधिक त्यांच्या दप्तराचे वजन असू नये, असेही मंत्रालयाने सुचविले आहे.
विद्यार्थी आणि शिक्षण याबाबत केला गेलेल्या अभ्यासानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचा अवलंब करून शिक्षण मंत्रालयाने शाळा व्यवस्थापनांना काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्याच्या दृष्टीने त्यांचे नियमित वजन करण्यात यावे, असे शाळांना सांगण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून डबा आणावा लागू नये. शाळांनी त्यांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करावी, असेही सांगण्यात आले आहे.
चाके असलेल्या दप्तरांवर बंदी घालण्यात यावी. कारण पायऱ्या, जिने चढता, उतरताना त्यामुळे विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. शाळेचा अथवा तासिकांचा कालावधी लवचिक ठेवण्यात यावा. दिवसभरात शारीरिक शिक्षण आणि व्यायाम यांनाही पुरेसा वेळ देण्यात यावा. शालेय पाठ्यपुस्तकांप्रमाणेच अवांतर वाचनाला प्रोत्साहन द्यावे. दुसरी पर्यंत गृहपाठ नको. तिसरी ते पाचवीपर्यंत आठवड्यातून २ तास, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज एक तास आणि नववी ते बारावीपर्यंत जास्तीत जास्त दोन तास गृहपाठ देण्यात यावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.