पुणेमहाराष्ट्र

तंत्रशिक्षण’च्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

परीक्षा ९ जुलैपासून घेण्यात येणार आणि निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

पुणे (प्रतिनिधी) राज्यातील तंत्रनिकेतन, औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमासह पाच अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या व शेवटच्या वर्षीची परीक्षा ९ जुलैपासून घेण्यात येणार आहे आणि निकाल आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.

या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काल प्रसिध्द केले. यात सहा सत्राच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सहावे सत्र, दोन वर्षाच्या औषधनिर्माण अभ्यासक्रमातील द्वितीय वर्ष, तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमातील तृतीय वर्ष, आठ सत्राच्या पार्टटाईम पदविका अभ्यासक्रमातील आठवे सत्र आणि शासन मान्य अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे अंतिम सत्र/वर्ष या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

दरम्यान, करोनामुळे राज्य सरकारने सर्व अभ्यासक्रमाच्या शेवट्या सत्र किंवा वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण मंडळाच्या विद्वत समितीची बैठक १४ मे रोजी पार पडली. त्यामध्ये या परीक्षा कशा घ्यायचे याचे नियोजन करण्यात आले. मंडळाचे संचालक डाॅ. विनोद मोहितकर यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले.ज्या शेवटच्या सत्राच्या तथा वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही विषय बॅकलाॅग राहिले आहेत त्यांची परीक्षा १ ते ८ जुलै दरम्यान होणार आहे. ही परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात येणार आहे. अंतीम सत्र अथवा वर्षाचा १३ मार्चपर्यंत ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. त्यावरून परीक्षा घेतली जाईल व गुण दिले जाणार आहेत.तर, इतर सत्राच्या किंवा वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याने त्यांना पुर्वीच्या सत्राच्या गुणांवर व चालू सत्रातील कामगिरीवर अंतर्गत मूल्यांकन केले जाईल. त्यानुसार त्यांना गुण देऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश तृतीय सत्रात किंवा पाचव्या सत्रात होणार आहे. त्यांना त्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय सत्रातील बॅकलाॅग राहिलेल्या विषयात २०२०-२१ च्या पहिल्या सत्रात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ आॅगस्टला सुरू होणार आहे. तर, नव्याने प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्यांचे वर्ग १ सप्टेंबर रोजी सुरू होतील, असे परिपत्रकात नमूद केले आहे.तथापि, राज्य तंत्र शिक्षण मंडळाने परीक्षांचे नियोजन केले आहे आणि त्यानुसार परीक्षांची तयारी सुरू आहे. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आडवड्यात पुन्हा एकदा तंत्रशिक्षणच्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यावेळची करोनाच्या स्तिथीवर परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *