ऑनलाइन वृत्तसेवापुणे

लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त उपस्थितीवर कारवाई

पुणेः पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभासह इतर कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त नागरिकांना सहभागी करून घेऊ नये, अन्यथा कडक कारवाईचा इशारा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहे. मोजक्या लोकांमध्ये लग्न आणि इतर समारंभ करीत असताना सामाजिक अंतर भान आणि मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक आहे, त्याचा प्रभावी वापर न झाल्यास संबंधितावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
दिवाळीनंतर गावोगावी लग्न समारंभासह इतर कार्यक्रम सुरू झाले आहेत; मात्र नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोनामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याशिवाय नियमभंग करणार्‍याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अनेकांकडून कोरोनाची खबरदारी घेतली जात नसल्यानेच संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आता गावोगावी लग्न आणि इतर समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करणार्‍याना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

लग्न समारंभात सामाजिक अंतर भान, सॅनिटायझरचा वापर, मुखपटी वापरणे बंधनकारक आहे

मंगल कार्यालय व्यवस्थापकाने संबंधित लग्नात येणार्‍या नागरिकांची यादी घेणे आवश्यक आहे. बेकायदेशीर गर्दी, जमाव होऊ न देणे ही जबाबदारी मंगल कार्यालय चालकाची आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभासह इतर कार्यक्रमात नागरिकांनी 50 पेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करू नये. अन्यथा कडक कारवाई केली जाणार आहे. सामाजिक अंतर भान बाळगून कार्यक्रम करणे संबंधीतांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय व्यवस्थापकासह इतरांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.