बीड

कोरोना पासून बचाव होण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे–जिल्हाधिकारी राहूल रेखावार

सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत असल्यामुळे केले आवाहन

बीड-दि. १-जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी अनेक व्यवसाय, संस्था, कार्यालये, उद्योग, व्यापार आदींना अटी-शर्ती सह परवानगी दिली आहे, महत्त्वाचे कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर संबंधितांनी यावेळी कोरोना पासून बचाव होण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

सध्या सणांच्या निमित्ताने बाजार तसेच खरेदीसाठी गर्दी होत असल्यामुळे आणि बर्‍याच ठिकाणी प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सदर आवाहन केले आहे.

घराबाहेर पडलेनंतर नागरिकांनी प्रवास, खरेदी आणि कामा दरम्यान मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटाइजर ने अथवा साबणाने हात स्वच्छ धुवावे तसेच विविध नियमांचे व निर्देशांचे पालन करून स्वतःचा आणि कुटुंबातील सदस्यांचा बचाव करावा.

राज्य शासनाने “माझे कुटूंब -माझी जबाबदारी” अभियान राबविले असून दुसरी लाट थोपवण्यासाठी व संसर्ग कमी होण्यासाठी आपणच आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. प्रशासन तर कार्यवाही करत आहे पण नागरिकांनी देखील नियम पालन केले तर कोरोनाचा संकटापासून बचाव करण्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले आहे.