एसटी कामगारांच्या पगारासाठी महामंडळ 2 हजार कोटींचे कर्ज घेणार
मुंबई | कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासूनचे एसटी कामगारांचे पगार थकले आहेत. सणा सुदीलाही सुरुवात झाली आहे. त्यात आता दिवाळीही आली आहे. इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार असून त्याकरिता एसटी महामंडळ २ हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच एसटीकडून राज्य सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. कोरोनाकाळात एसटीला मिळणार २२ कोटींचं उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा तोटा साडे पाच हजार कोटींचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजे. नाही तर तोटा वाढतो.
कोरोनामुळे उत्पन्नाची साधनं वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झालं. त्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत.
त्यातच दिवाळी सारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याला मोठा तोटा सहन करावा लागल्याने एसटीला मदत करावी अशी शासनाचीही परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचं कर्ज काढण्यात येईल, असे परब म्हणाले आहेत.