खुशखबर:केंद्र सरकार दिवाळीपूर्वी जनधन खात्यात पैसे जमा करून खास भेट देणार
केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन कल्याण योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत महिला खातेदारांना आर्थिक मदत दिली जाते. कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. उद्योग धंदे ठप्प झाल्यामुळे कित्येकांचा रोजगार गेला. अशावेळी केंद्र सरकारने गरीब जनतेला आर्थिक मदत म्हणून त्यांच्या जनधन खात्यात पैसे जमा केले होते. मात्र, ही मदत अपूरी असल्याचे सरकारला वाटतआहे. म्हणून केंद्र सरकार दिवाळीपूर्वी जनधन योजनेच्या खातेधारकांना खास भेट देणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत गरिबांची दिवाळी गोड होणार आहे.
केंद्र सरकारमार्फत पुन्हा एकदा जनधन महिला खातेदारांच्या खात्यात १५०० रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्टनुसार मोदी सरकार गरीब आणि दुर्बल कुटुंबातील सदस्यांसाठी तिसरे प्रोत्साहन पॅकेजही जाहीर करू शकते. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सरकार पुन्हा एकदा आर्थिक मदत आणि धान्य देण्याची घोषणा करू शकते. मार्च २०२१ पर्यंत गरीब आणि असुरक्षित कुटुंबातील लोकांना ही सुविधा मिळू शकेल. यापूर्वी सरकारने २० कोटींपेक्षा जास्त महिला जनधन खातेधारकांच्या खात्यामध्ये तीन महिन्यांमध्ये १५०० रुपयांची रक्कम जमा केली आहे.
केंद्र सरकारने जूनपर्यंत सुमारे ८० कोटी गरीब कुटुंबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. ती नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली. आता पुन्हा एकदा लाखो गरिबांना धान्य देण्याची सुविधा मार्च २०२१ पर्यंत वाढविली जाऊ शकते. गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ही सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ५ किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. त्याबरोबर एक किलो हरभरा डाळही दिली जाते.
जनधन खाते उघडण्याची प्रक्रिया –
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत शून्य शिल्लक बचत खाते उघडता येते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेक बुक आणि इतरही अनेक फायदे दिले आहेत. जनधन योजनेंतर्गत खाते उघडायचे असल्यास आपण यासाठी कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करू शकता. या अर्जामधील सर्व माहिती भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर ती बँकेत जमा करावी लागेल. यानंतर, आपले खाते त्वरित उघडले जाईल.
आवश्यक कागदपत्रे –
१) जनधन खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससह केवायसीची आवश्यकता पूर्ण करणारी कागदपत्रे सादर करावी लागतात.
२) तुमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यास आपण एक लघु खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड फोटो आणि बँक अधिकाऱ्यासमोर सही करावी लागेल.
३) जनधन खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
४) १० वर्षांपेक्षा अधिक वय असेलेली कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते.
जनधन खात्यात मिळणाऱ्या सुविधा –
१) या खात्याअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्डसुद्धा दिले जाते.
२) यासह डेबिट कार्डवर १ लाख रुपयांचा अपघात विमा मोफत दिला जातो.
३) सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना थेट निधी हस्तांतरित करता येतो.
४) प्रत्येक कुटुंबासाठी दहा हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्टची सुविधा केवळ एका खात्यासाठी उपलब्ध आहे, विशेषत: कुटुंबातील महिलेसाठी.