बीड

संकट गंभीर आहे मात्र ठाकरे सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची आता खरी गरज-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड, दि.१९ (प्रतिनिधी)- परतीच्या पावसाने शेतकरी उद्धवस्त झाला आहे, संकट मोठे आहे, परिस्थिती गंभीर आहे, पण परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाकरे सरकार खंबीर आहे. पंचनामे सुरू आहेत. कर्ज घेवू पण, शेतक-यांना मदत करू असा विश्वास बीडमध्ये महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. ते आज परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यांच्यासोबत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख कूंडलिक खांडे हे उपस्थित होते.

परतीच्या पावसाने हाहाकार घालत खरीप हंगाम उद्धवस्त केलेल्या बीड जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी आलेले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बांधावर जावून शेतीची पाहणी करत बीडमध्ये शेतक-यांशी संवाद साधला. आज गेवराई तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करून पाडळशिंगी, शिदोड, लोळदगाव भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करत बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उपस्थित शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. त्यांनी दिलेला आदेश पाळत आज मी बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतक-यांसमोरील संकटही मोठे आहे. ऊस,कापूस, सोयाबीनसह फळबागा आणि फुलबागा उद्धवस्त झाले आहेत.हवालदिल झालेल्या शेतक-यांना धीर देण्याचे काम सरकार करत आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. खरिप हंगाम तर उद्धवस्त झालाच रब्बी हंगामही धोक्यात येतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण जमिनीतील पाणी हटवण्यासाठी आणि जमिन मोकळी करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे पण शेतक-यांनी घाबरण्याचे काम नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच शेतक-यांना कर्जमाफी दिली. उपेक्षित शेतक-यांना मदत देण्याची भूमिका असतानाच कोरोनाचे संकट मानगुटीवर बसले. कोरोनाने आपण सर्वं जण वेगळ्या संकटात आहोत, त्या संकटातून अजून बाहेर पडलो नाही तोच परतीच्या पावसाचे नवे संकट उभे राहिले आहे.अशा गंभीर परिस्थितीमध्ये आणि कोरोनाचे संकट कठीण असताना केंद्र सरकारने मदतीचा हात आखडता घेतला. केंद्राने मदत नाकारली मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियोजनबद्ध काम करत प्रत्येक कोरोनाग्रस्तावर योग्य उपचार झाले पाहिजेत त्यासाठी प्रयत्न केले. आता जनतेने माझे कुटुंब,माझी जबाबदारी पार पाडायची आहे. शेतक-यांच्या बाबतीत विचार केला तर आम्ही कर्जही देवू पण शेतक-यांना मदत करू असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी दिला.तर अशा संकट काळात उत्पादक शेतकऱ्यांना आता खरी मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले

तत्पूर्वी आपल्या भाषणामध्ये बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेतक-यांशी संवाद साधला. ते म्हणाले, आस्मानी संकट आहे, बांधावर जावून पाहणी केली आहे, गेल्या दहा वर्षात एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली नव्हती. ऐन मौसमात असताना सर्वं काही उद्धवस्त झाले आहे. शेतक-यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. कर्जमाफीनंतर शेतक-यांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. कारण उद्धव ठाकरेंसारखे जिव्हाळा निर्माण करणारे मुख्यमंत्री आहेत, आपला माणूस आहे ही मानसिकता सामान्य माणसामध्ये निर्माण झाला आहे. दिवाळीपूर्वी शेतक-यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे असा विश्वास क्षीरसागरांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित,जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,
दिनकर कदम, अरूण डाके,दिलीप गोरे,माजी नगराध्यक्ष सहाल चौउस,
जिल्हासंघटक नितीन धांडे, बप्पासाहेब घुगे,सखाराम मस्के, उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे,वैजीनाथ तांदळे,अरुण बॉंगाने, बद्रीनारायण जाजू,राधेश्याम कासट,विष्णुदास बियाणी,परमेश्वर सातपुते,शुभम धूत,मुखींद लाला,गोरख सिंगण,मोईन मास्टर,यांच्यासहित मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.