आरोग्य

वेळीच उपचार व काळजी घेतल्यास न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय वा खाजगी रुग्णालयात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी न्यूमोनियामुळे २१ टक्के मृत्यू होतात. वेळीच उपचार व योग्य काळजी घेतल्याने हा आजार नियंत्रणात आणणे शक्य आहे.

न्यूमोनिया होण्याचे प्रकार

कम्युनिटी अ‍ॅक्वायर्ड न्यूमोनिया’
आपण ज्या वातावरणात राहतो, त्यात अनेक प्रकारचे जिवाणू व विषाणू असतात. त्यांच्या हल्ल्यामुळे हा न्यूमोनिया होतो. फुप्फुसाचा आधीच काही आजार असेल तर हा न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. जिवाणूंमुळे होणारा न्यूमोनिया दोन ते चार आठवडय़ांत बरा होतो. पण, विषाणूंमुळे होणारा न्यूमोनिया बरा होण्यास अधिक कालावधी लागतो.

हॉस्पिटल अ‍ॅक्वायर्ड न्यूमोनिया’

दुसऱ्या एखाद्या आजारासाठी रुग्णालयात ४८ तासांपेक्षा जास्त वेळ राहावे लागले तर काही जणांना हा न्यूमोनिया होऊ शकतो. याला रुग्णालयात आढळणारे विविध जिवाणू जबाबदार असतात.
ज्या रुग्णांना व्यवस्थित गिळता येत नाही किंवा जे बेशुद्धावस्थेत असतात, ज्या रुग्णांच्या श्वासनलिकेत अन्नाचे कण वा पाणी जाण्याचा धोका असतो, त्यांनाही विविध जिवाणूंमुळे हा आजार संभावतो.
मधुमेह, एचआयव्ही, कर्करोग असलेले रुग्ण, वा ‘स्टीरॉइड’च्या गोळ्यांचे जास्त दिवस सेवन करत असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, बुरशी यांचा धोका या लोकांना अधिक असतो.

व्हेंटिलेटर असोसिएटेड न्यूमोनिया’

श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले तरी त्यांना न्यूमोनियाचा धोका इतरांपेक्षा अधिक असू शकतो.

लक्षणे कोणती?
खोकला, थकवा, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, बेडके पडणे, छातीत दुखणे अशी लक्षणे न्यूमोनियात दिसून येतात. काही रुग्णांमध्ये खोकल्याबरोबरच रक्त मिश्रित बेडके पडणे, रक्तदाब कमी होणे किंवा वृद्धांमध्ये बेशुद्धी हेही लक्षण असू शकते.

न्यूमोनियाचे दुष्परिणाम
*अशक्तपणा येणे

  • फुप्फुसांमध्ये पाणी किंवा पस भरणे
  • श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे, तो अपुरा पडणे
  • संपूर्ण शरीरात संसर्ग होणे
  • मेंदूत पस होणे
  • हृदयाला संसर्ग होणे

लसीकरण
काही जिवाणू वा विषाणूजन्य न्यूमोनिया टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. गरोदर स्त्रिया, ६५ वर्षांहून जास्त वयोगटातील व्यक्ती किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो.

निदान व औषधोपचार

  • सर्वप्रथम ‘पल्स ऑक्सिमीटर’ या यंत्राने रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार त्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची कितपत गरज आहे, हे डॉक्टर निश्चित करतात.
    *रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्यांतून फुप्फुसाचा संसर्ग रक्तात किती प्रमाणात पसरले आहे आणि त्याचा दुसऱ्या अवयवांवर किती परिणाम झाला आहे काय हे निश्चित केले जाते. त्यानंतर रुग्णांवर उपचार केले जातात.
  • थुंकीच्या तपासणीद्वारे नेमक्या कोणत्या किटाणूमुळे न्यूमोनिया झाला आहे आणि त्या किटाणूवर कोणते प्रतिजैविक वा बुरशीविरोधी किंवा क्षयविरोधी औषध उपयुक्त ठरेल हे स्पष्ट होते. संसर्ग कमीतकमी दोन आठवडे राहण्याची शक्यता असते.
  • डॉक्टरांनी स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या छातीची तपासणी केल्यावरही बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. पण छातीच्या एक्स- रेद्वारे न्यूमोनिया किती प्रमाणात पसरलेला आहे, फुप्फुसात पाणी झाले आहे काय, याचे निदान करता येते.
  • ‘ब्राँकोस्कोपी’ आणि ‘ब्राँकोएलव्हीओलर लवॉज’ या तपासण्यांच्या माध्यमातून रुग्णाच्या श्वासनलिकेची तपासणी केली जाते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांकरिता ही तपासणी उपयुक्त आहे.

डॉ. तिलोत्तमा पराते
(शब्दांकन : महेश बोकडे)
साभार-लोकसत्ता संग्रहित