नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु, आता अर्थचक्र सुरू करण्यासाठी आता अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशातच राज्य नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही अनलॉक केले जाणार आहे. राज्यात पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूया, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
करोनावर अद्यापही लस आलेली नसल्यामुळे आता आपल्याला करोनासोबत राहावे लागणार आहे.
त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले.
करोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे. अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी 12,134 करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 17,323 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12,29,339 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 23,6491 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.63% झाले आहे.