कोरोनापासून बचावासाठी आयुष 64 प्रभावीआयुर्वेदिक औषध
केंद्रीय आयुष मंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स केल्या जारी
नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : भारतात कोरोना रुग्णांवर केंद्र सरकार आयुर्वेदिक (ayurveda) पद्धतीने उपचार करत आहे. काही आयुर्वेदिक औषधांचं सुरुवातीला रुग्णांवर क्लिनिक ट्रायल घेण्यात आलं. त्यापैकी काही औषधं कोरोनावर उपचारासाठी परिणामकारक असल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता केंद्रीय आयुष मंत्रालयाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आयुष मंत्रालयाने आयुष 64 (Ayush 64) औषध वापरण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाची लक्षणं न दिसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी आयुष 64 हे 500 मिलिग्रॅम औषध दिवसातून दोनदा कोमट पाण्यातून घ्यावं.
15 दिवस किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे औषध घ्यावं, असं आयुष मंत्रालयाने सांगितलं. याशिवाय कोरोनाची लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं, असा सल्लाही सरकारने दिला आहे.
कोरोनातून बरं झाल्यानंतर अश्वगंधाचा 500 मिलीग्रॅम रस किंवा एक ते तीन ग्रॅम पावडर दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यातून घ्यावी. हा उपाय 15 दिवस किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार करावा. डॉक्टारंच्या काय आणि कशी काळजी घ्यावी हेदेखील सराकरनं सांगितलं आहे. याशिवाय दिवसातून एकदा कोमट पाणी किंवा दुधातून च्यवनप्राश घ्यावं.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी किंवा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी काय करावं याबाबतही सरकारने उपाययोजना दिल्या आहेत. दिवसभर गरम पाणी प्या, ताजं आणि गरम अन्न खा, व्यायाम आणि योगा करा, हर्बल टी प्या, नाकात खोबरेल किंवा तिळाचं तेल लावा. कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या. खोकला आणि घशात खवखव असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा साखर किंवा मधासोबत लवंग पावडर मिसळून घ्या, अस सरकारने सांगितलं आहे.