पॉलिटेक्निक अभ्यासक्रम व डिप्लोमा प्रवेशासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार
पुणे – दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सलग चौथ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य तंत्रशिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निक अभ्यासक्रम व डिप्लोमा प्रवेशासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक आणि बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे.
दरम्यान, करोना परिस्थितीचा विचार करून ‘डीटीई’ने प्रवेश अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी; तसेच राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना कागदपत्रे व दाखले जमा करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी पालकांकडून होत होती.
यावर डीटीईने अर्ज सादर करण्याची मुदत चौथ्यांदा वाढविली.
दरम्यान, प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 9 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी 10 ते 12 ऑक्टोबर अशी मुदत आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी डिप्लोमा प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याची माहिती ‘डीटीई’चे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. त्याचप्रमाणे थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.