मेडिकल प्रवेशासाठीचा 70-30 चा कोटा रद्द करावा-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड(प्रतिनिधी)
राज्यात मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात आणि प्रवर्गनिहाय आरक्षण असतानाही प्रादेशिक आरक्षणाची 70ः30 टक्के कोटा पद्धत राज्यात लागू केल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. कोटा पद्धत घटना विराधी असल्याने ती रद्द करण्याची मागणी पुन्हा जोर धरत असून यावर आपण पुढाकार घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.त्यामुळे मेडिकल प्रवेशासाठी 70 30 चा कोटा रद्द करावा अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे
राज्यातील सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 70ः30 कोटा पद्धत लागू आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात कमी तर उर्वरित महाराष्ट्रात वैद्यकिय महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. मराठवाड्यात केवळ 5 कॉलेज तर 680 जागा, विदर्भात 8 कॉलेज व 1190 जागा आहेत. या उलट पश्चिम महाराष्ट्रात 26 कॉलेज तर 3950 जागा आहेत.
या कारणामुळे नीट परीक्षेत चांगले गुण असूनही मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशासाठी झगडावे लागते. मराठवाड्यात गुणवत्ता मोठ्या प्रमाणात असतानाही केवळ प्रादेशिक आरक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांना वैद्यकिय अभ्यासक्रमापासून वंचित रहावे लागत आहे. मागील सरकारने हे प्रादेशिक आरक्षण लागू करताना कोणताही कायदा किंवा घटनात्मक तरतूद न करता ते लागू केले आहे. सदरील आरक्षण अन्यायकारक असून या वर्षीच्या वैद्यकिय शाखेचे प्रवेश होण्यापूर्वी वरीलप्रमाणेअसलेल्या मागणीनुसार आपण तातडीने निर्णय घ्यावा. जेणे करून मराठवाड्यातील व विदर्भातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. तरी घटनात्मक तरतूद नसलेले आरक्षण तात्काळ रद्द करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवेदनात केली आहे