‘मंदिरे उघडा असा धोशा लावून कोणी हिंदुत्ववादी ठरत नाही’
मुंबई: ‘‘मंदिरे उघडा’’ असा रोजचा धोशा लावून कोणी हिंदुत्ववादी ठरणार नाही व ‘‘मशिदी, चर्च खुली करा’’ अशा मागण्या करून कोणाच्या सेक्युलर टोप्यांवर चार चांद लागणार नाहीत. सध्याचा काळ ‘जगा आणि जगू द्या’ या मंत्राचा धोशा लावण्याचा आहे,’ असा खोचक टोला शिवसेनेनं राज्य सरकारला सल्ले देणाऱ्या विरोधकांना हाणला आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये केंद्राचे म्हणजे राष्ट्रपती शासन सुरू आहे. तिथं करोना संसर्गामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यावरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यातील भाजप नेत्यांना सुनावलं आहे. ‘भाजपचे नेते रोज ‘‘हे उघडा आणि ते उघडा’’ अशी मागणी कोणत्या आधारावर करीत आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केले तर बरे होईल. आजच्या संकटकाळात समाजाला मानसिक, धार्मिक आधार देण्याची गरज आहे, असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे. पण दक्षिणेतील तिरुपती बालाजी मंदिर उघडताच पहिल्या फटक्यात मंदिराचे ३४ पुजारी करोनाग्रस्त झाले. एकाने प्राण गमावले. याचे भान निदान राजकारण्यांनी तरी ठेवले पाहिजे. अमरनाथ यात्रा, माऊंट मेरीची जत्रा रद्द केली तरी भक्तांची जत्रा इस्पितळात उसळली आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी त्यांना खरे बळ तेथेच मिळत आहे,’ असं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.’आज देशात लोकांना धीर देण्याची, आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्याची सर्वाधिक गरज आहे. मुंबईत पाच हजार बेडचे जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय महापालिका उभे करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हे सुद्धा एक प्रकारचे भव्य मंदिरच आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.’कर्नाटकात करोनाची महामारी भयंकर पसरली आहे. ‘आता देवच काय ते बघेल’ असं तेथील भाजप सरकारच्या एका मंत्र्यानं म्हटलं आहे. देवच सर्व बघणार असेल तर इतक्या मोडतोडी व उपद्व्याप करून तुम्ही सत्तेवर आलात कशाला?,’ असा सणसणीत टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय.