चांगल्या आरोग्यासाठी आहारात ‘भाकरी’ किती महत्वाची
पुणे – आजच्या बदलत्या आहार पद्धतीमुळे अनेक भारतीय पदार्थ आपल्या जेवणाच्या ताटातून निघून गेले आहेत. पुर्वी लोकांच्या आहारात रोज भाकरी होती. आज मात्र भाकरी आपल्यापासून लांब जातेय व तीची जागा पाश्चात्य आहारीय पदार्थांनी घेतली आहे. आता लोक कमी प्रमाणात भाकरी खातात. खरपूस बाजरीच्या भाकरी किंवा कोणत्याही प्रकारची भाकरी ही नेहमीच आरोग्यासाठी पौष्टिक असते. वजन कमी करण्यासाठी, मधुमेह,रक्तदाब, हृदयरोग अश्या अनेक विकारांवर भाकरी फादेशीर आहे.
ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते म्हणून सर्व प्रकारच्या पोटाच्या आजारात गुणकारी आहे.
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.
ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे
हृदयरोग टाळता येतात.
ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.