देशात समूह संसर्ग सुरू, ‘आयएमए’ अध्यक्षांनीही केलं मान्य!
नवी दिल्ली : देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. देशात दररोज ३४ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडताना दिसतेय. आत्तापर्यंत भारतातील करोना रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहचलीय. याच दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नं भारतात करोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं आणि परिस्थिती बिकट बनत चालल्याचं म्हटलंय.
करोना रुग्ण आढळत आहेत. हे वास्तव आहे. करोना आता ग्रामीण भागांनाही विळखा घालतोय. हे वाईट संकेत आहेत. हा समूह संसर्ग असल्याचं लक्षात येतंय, असं डॉ. मोंगा यांनी म्हटलंय.
डॉ. मोंगा यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप देशात समूह संसर्ग फैलावल्याचं मान्य करण्यात आलेलं नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या दाव्याला अनेक आरोग्य तज्ज्ञांनीही आव्हान दिलंय. यासोबतच करोना व्हायरसच्या रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण भारतात आहेत.
एकाच दिवशी ३४ हजार बाधितांची भर
गेल्या २४ तासांत देशभरात ३४ हजार ८८४ रुग्णांची भर पडून करोनारुग्णांची एकूण संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहोचली. २४ हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांची भर पडण्याचा हा सलग दहावा दिवस ठरला. केवळ २४ तासांत करोनामुळे ६७१ मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २६ हजार २७३ वर पोहोचला आहे.
सध्या देशभरात उपचार घेत असलेल्या करोनारुग्णांची संख्या तीन लाख ५८ हजार ६९२ इतकी आहे. उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा लाख ५३ हजार ७५१ झाली आहे. गेल्या २४ तासांत १७ हजार ९९४ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्त रुग्णांची टक्केवारी ६२.९३ वर पोहोचली असून सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या दोन लाख ९५ हजार ५९ ने जास्त असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आतापर्यंत ९६.०९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले असून करोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर ३.९१ टक्के इतका आहे.
साडे तीन लाख चाचण्या
गेल्या २४ तासांत तीन लाख ६१ हजार २४ चाचण्या पार पडल्या. आतापर्यंत देशभरात एक कोटी ३४ लाख ३३ हजार ७४२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दर दहा लाखांमागे आता ९७३४.६ चाचण्या होत आहेत.