मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य लॉक डाऊन वाढवणार असल्याचा संकेत?
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूची साखळी तोडण्यास अद्याप यश आलेले नाही अशी स्पष्टोक्ती केली. देशव्यापी लॉक डाऊनचा तिसरा टप्पा संपण्यास केवळ ९ दिवस उरलेले असताना देखील महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री नक्की काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे
लॉक डाऊन वाढणार?
मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी बोलताना, ‘राज्यातील लॉक डाऊनमुळे कोरोनाची गती रोखण्यास यश आले असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यात अद्याप यश आले नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.’ असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य राज्यातील लॉक डाऊन वाढणार असल्याचा संकेत मानण्यास वाव आहे.
मुंबईमध्ये लष्कर नाही; मात्र…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना मुंबईमध्ये लष्कर बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मुंबईमध्ये लष्कर बोलावणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यातील पोलीस कर्मचारी कोरोना ड्युटीमुळे कंटाळले असून गरज पडल्यास त्यांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून (केंद्रीय सुरक्षा दलाची) मदत घेऊ असे देखील त्यांनी स्पष्ट केले.