करोनाबरोबरच आता डेंग्यूच्या प्रादुर्भावाची भीती!
नवी दिल्ली – पावसाळा सुरू होत असतानाच देशभर डेंग्यूची साथ पसरण्याचा धोकाही वाढला आहे. कोविड-19 आणि डेंग्यू या दोन्हीमधील लक्षणे एकसारखीच आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर या दुहेरी धोक्यामुळे मोठा ताण येऊ शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
डेंग्यू आणि करोना या दोन्ही आजारांचा मौसम एकदम सुरू झाल्यास एकाचवेळी वेगवेगळ्या चाचण्यांचा ताण देखील येऊ शकतो. त्याचा फटका रुग्णांनाही बसण्याची शक्यता आहे.
एका आजारामुळे दुसऱ्या आजारामधील गुंतागुंत अधिक वाढू शकते. हे अधिक जीवघेणे ठरू शकते. देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या 8 लाखांच्यावर आणि मृत्यूची संख्या 22 हजाराच्यावर पोहोचली आहे. तर भारताता दरवर्षी 2 लाख जणांना डेंग्यू होतो असे व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी 2016-19 च्या आकडेवारीच्या आधारे म्हटले आहे.
2019 मध्ये 1 लाख 36 हजार 422 जणांना डेंग्यू झाला होत आणि अंदाजे 132 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. दक्षिण भारतात वर्षभर आणि उत्तर भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला डेंग्यूची साथ पसरलेली असते. करोना अणि डेंग्यू दोन्हीमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी ही समान लक्षणे आहेत. दोन्हीच्या विषाणू एकमेकांना मदतीचेच काम करतात, असा इशारा कोलकाता येथील ऍमिटी विद्यापीठाचे व्हायरोलॉजिस्ट आणि कुलगुरू ध्रुज्योती चट्टोपाध्याय यांनी दिला.
डेंग्यूच्या संसर्गाचा विचार करता आपल्या सध्याच्या वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडू शकतील, अशीही भीती आहे. करोनाच्या रुग्णांनाच रुग्णालये अपुरी पडत असताना डेंग्यूच्या रुग्णांना कोठे उपचार द्यायचे असाही प्रश्न आहे.