शैक्षणिक वर्ष सुरू होणार नोव्हेंबरपासून?
मुंबई – सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास विद्यापीठ अनुदान समितीने (युजीसी)ने मान्यता दिली आहे. यानंतर आता युजीसी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत मंगळवारी रात्री उशिरा घेण्यात आल्याची माहिती आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे असा निर्णय झाला आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा १५ ऑगस्टनंतर होणार आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे बैठकीत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, युजीसीच्या निर्णयानंतर विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेसंदर्भात राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने करोनाच्या संसर्गाचा धोका पाहता परीक्षा न घेण्याची भूमिका घेतील आहे, तर यूजीसीने राज्यांना परीक्षा घेण्याबाबत पत्र पाठवले आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यूजीसीचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा असल्याचे सामंत यांनी म्हंटले आहे.