महाराष्ट्रमुंबई

८-९ तास स्वत: गाडी चालवत पंढरपूरची वारी करणारे पहिले मुख्यमंत्री

विठ्ठल भेटीची आस अन जगाच्या कल्याणाचे साकडे

मुंबई-यंदाची आषाढी वारी साधेपणानंच साजरी झाली. ना गजबलेला चंद्रभागेचा काठ दिसला. ना मंदिर परिसरात भक्तीसागराचं दर्शन झालं. करोनामुळे साधेपणानंच विठू माऊलीची महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाची पूजा केली. मात्र, मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले.
आषाढी एकादशी बुधवारी (१ जुलै) साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल झाले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. ८ ते ९ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली.

पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशीही संवाद साधला. मात्र, सगळ्यात जास्त कौतुक होतंय ते मुख्यमंत्री स्वतः सारथ्य करत पंढरपूरला गेले या गोष्टीचं. अशा प्रकारे विठ्ठलाच्या महापूजेसाठी जाणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *