सूर्यग्रहण पाहायचं असेल तर ही काळजी घ्या, महाराष्ट्रात असं दिसेल ग्रहण!
मुंबई 20 जून: 2020 या वर्षातलं पहिलं ग्रहण रविवारी 21 जून रोजी होत आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये चंद्र आल्याने चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यामुळे सूर्य किरण पृथ्वीच्या त्या भागात पोहचू शकत नाही. त्यालाच ग्रहण लागलं असं म्हटलं जातं. भारतातल्या काही राज्यांमध्ये कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ग्रहणाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. मात्र ही वैज्ञानिक घटना असून त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे असं आवाहन वैज्ञानिक कायम करत असतात.
ग्रहण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे मात्र त्यासाठी काही काळजी घेणे गरजेचं आहे. साध्या डोळयांनी ग्रहण पाहणं हे धोक्याचं असून त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकतो.
भारतात पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यात ते कंकणाकृती स्वरूपात दिसणार आहे. इतर राज्यांमध्ये हे ग्रहण खंडग्रास दिसेल. मुंबईत सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होईल. 11.28 ही ग्रहणाची मध्य वेळ आहे. दुपारी 1.28 ला ग्रहण संपून जाईल.
ग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल्स मिळतात त्याचा वापर करणं हे सगळ्यात उत्तम आहे. त्याचबरोबर खास प्रकारच्या काचाही उपलब्ध असतात त्यातूनही हे ग्रहण पाहता येईल. स्थानि विज्ञान शिक्षकांना विचारूनही काही गोष्टी करता येऊ शकतात.