शिक्षणाचा नवा “बीड पॅटर्न”, दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण
कोरोना संकट काळात दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शिक्षणाचा नवा बीड पॅटर्न तयार करण्यात आला आहे.
बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बीड जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शिक्षणाचा नवा बीड पॅटर्न तयार करण्यात आला आहे. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते व्ही-स्कूल (VSchool) या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात झाली. यामुळे बीड जिल्ह्यातील 47 हजार दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे.
पुणे येथील वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (VOPA) या सामाजिक संस्थेने बीड जिल्ह्यातील काही नामवंत विषयतज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या कामात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली. विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म http://ssc.vopa.in/ येथे मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे
या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले, “जेव्हा आपलं दैनंदिन शैक्षणिक काम सुरु असतं तेव्हा अशा प्रकारचे वेगळे शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण होत नाही. आपली इच्छा असूनही असे शैक्षणिक उपक्रम मागे राहतात. ती इच्छा पूर्ण न झाल्याने आपल्याला समाधानही मिळत नाही. मात्र, आज कोरोनाच्या संकटाने आपल्याला हे शैक्षणिक स्वप्न सत्यात आणण्यासाठी संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना वोपाच्या माध्यमातून ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आपल्याला यश आले आहे. वोपाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जो उपक्रम सुरु केला, त्यासाठी मी वोपाचे आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांचे आभार मानतो.”
या उपक्रमाची वैशिष्ट्ये काय?
विद्यार्थ्यांचा स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी प्रयत्न
यासाठी कोणत्याही अॅप्लिकेशन, नोंदणी इत्यादी गोष्टींची गरज नाही. कोणत्याही मोबाईलवर याची उपलब्धता होते.
कमीत कमी इंटरनेट स्पीडवर देखील हा प्लॅटफॉर्म चालेल.
यात फक्त व्हिडीओ नाही, तर टेक्स्ट, अॅनिमेटेड फोटोजचा वापर.
मोबाईलचा उद्देश केवळ शिक्षण पोहचण्यासाठी केला आहे. मात्र, खरं शिक्षण मोबाईलच्या बाहेर वही, पुस्तक, पेन आणि परिसर यांचा वापर व्हावा यावर भर दिला आहे.
प्रश्नपत्रिका आणि सराव दिले आहेत.
शाळा आणि स्थानिक शिक्षकांची यात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. यात वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घेण्यास सांगितले आहे आणि शिक्षकांनाही यात मदतीबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना कोठेही क्लिक करावं लागत नाही किंवा इतर पेजवर जावं लागत नाही. त्यामुळे कमीत कमी इंटरनेट आणि विद्यार्थ्यांचं अधिकाधिक लक्ष वेधून घेण्यास मदत होते.
यात विद्यार्थ्यांना देखील आपली मतं नोंदवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातून शिक्षकांच्या कामाचं आणि विद्यार्थ्यांच्या सहभाग आणि आकलनाचं मुल्यमापन करता येणार आहे.
विशेष म्हणजे केंद्रशासनाच्या दीक्षा अॅप मधील सर्व शैक्षणिक व्हिडीओचा देखील येथे खुबीने वापर केला आहे. म्हणजेच शासन निर्देशित ऑनलाइन शिक्षणाला स्पर्धा न करता पूरक अशीच व्यवस्था केली आहे.
सामाजिक व शैक्षणिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी हा प्लॅटफॉर्म
या उपक्रमाविषयी बोलताना हा उपक्रम उभा करणाऱ्या वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, ““बाजारात उपलब्ध असलेले महागडे ऑनलाइन शिक्षणाचे अॅप्स समाजातील सामान्य पालक आपल्या पाल्यांसाठी घेऊ शकत नाहीत. परिणामी गुणवत्तापूर्ण आधुनिक शैक्षणिक साधने व ज्ञान एका विशिष्ट वर्गापूरतेच सीमित राहते. पर्यायाने भविष्यात सामान्य घरातील विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये पिछाडीवर राहण्याची शक्यता वाढते. सामाजिक व शैक्षणिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म व व्यवस्था विकसित केली आहे.”