परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी ब्राम्हण समाज रस्त्यावर उतरला
राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता ब्राह्मण समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज (10 ऑक्टोबर) ब्राह्मण संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.
शहरातील वंदे भारत हॉलपासून निघालेला हा मोर्चा दिल्ली गेटजवळ असलेल्या विभागीय आयुक्त कार्यलयावर धडकणार आहे. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण मोफत करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे. दरम्यान, या मोर्च्याच्या निमित्ताने सर्वचं ब्राह्मण संघटना एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले असून, ओबीसींकडून देखील आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. अशातच आता ब्राम्हण समाज देखील आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ब्राम्हण समाजाकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती दिसत आहे. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी ही प्रमुख मागणी यावेळी ब्राम्हण समाजाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. काही वेळातचं हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर आपल्या मागण्याचे निवेदन ब्राम्हण समाजाकडून विभागीय आयुक्त कार्यालयात दिला जाणार आहे.
ब्राह्मण समाजाच्या मागण्या…
ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.
ब्राह्मण समाजातील आर्थीक मागास घटकातील तरुणांना व्यवसायीक मदतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी.
ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे, स्थापन करण्यात यावे. व प्रत्येक जिल्ह्याला परशुराम भवन देण्यात यावे.
ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5 हजार मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी.
ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग-2 मधुन वर्ग- 1संवर्गात बदल करण्यात याव्यात त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.
ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करुन सामाजिक विडंबनातून मुक्ता करण्यात यावी.
परंपरागत राज्यातील मंदीरे ज्यात्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात यावी जेणे करुन मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थीतीत अबाधीत राहील.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना “भाररत्न” पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात यावे.
ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची, आयोगाची शासनस्तरावर नेमणुक करण्यात यावी.