महाराष्ट्रमुंबई

आळंदी आणि देहूच्या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने

पंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द


मुंबई
गेल्या सातशे वर्षांपासून सुरू असलेली पायी वारी या वर्षी होणार नाही. पहिल्यांदाच पंढरपूरची पायी वारी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथीमुळे ही आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जातील. या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमान यापैकी याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत झाली.
या बैठकीला उपस्थित असलेले देहू पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे यांनी सांगितलं की “पालखी प्रस्थान ठरल्या दिवशीच करेल. पण पादुका तिथेच ठेवल्या जातील. त्यानंतर दशमीच्या दिवशी राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे, त्या त्या जिल्ह्याचे पालक मंत्री आणि कलेक्टर सांगतील तसं पादुका पंढरपूरला जातील. मग त्या विमानानं नेतील, की हेलिकॉप्टरनं नेतील की एसटी बसनं नेतील, किती लोक त्यात जातील हा निर्णय स्वतः राज्य सरकार घेणार आहे.
तो निर्णय संस्थानांच्या प्रमुखांना सांगितला जाईल. त्याअनुशंगानं पादुका पंढरपूरला जातील. एकादशीला संतांची तिथे पांडुरंगाशी भेट होईल. जर पौर्णिमेपर्यंत थांबण्याची परिस्थिती असेल, तर तिथे थांबण्याची परवानगी देतील नाहीतर एकादशीच्या दिवशी परत यावं लागेल.” असं देहूच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे म्हणाले.
सगळ्या मुख्य पालख्यांच्या प्रतिनिधींसोबत एकत्र बैठक झाली आणि सगळ्यांना निर्णय मान्य आहे.
यंदा आषाढी एकादशी 1 जुलैला आहे. त्यासाठी परंपरेनुसार सुमारे तीन आठवडे आधी म्हणजे 12 जून रोजी देहू येथून संत तुकराम यांच्या तर 13 जून रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान नियोजित आहे.
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.
“श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून, विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल,” असं पवार म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *