महाराष्ट्रमुंबई

येत्या शैक्षणिक वर्षात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरु होणार

मुंबई, दि. ८ : बॅचलर इन स्पोर्टस सायन्स, बॅचलर इन स्पोर्टस मॅनेजमेंट व मास्टर इन स्पोर्टस सायन्स आणि मास्टर इन स्पोर्टस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. तसेच आता विद्यापीठ अनुदान आयोगाने या अभ्यासक्रमांना मान्यतेबाबत अधिसूचना निर्गमित केली असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

क्रीडा मंत्री श्री. केदार म्हणाले, देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या पदव्यांच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान मंडळाने (सुजीसी) मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात सुरु करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दीड वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा झाली. त्याचवेळी हे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार होते, परंतू त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होता. आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने अभ्यासक्रम सुरु करता आला नाही. आता हळूहळू कोरोना प्रादुर्भाव कमी कमी होत असल्याने विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्यांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

भारतातील क्रीडा शिक्षणाच्या विविध घटकांना योग्य ती मान्यता मिळविण्यासाठी ‘यूजीसी’कडे स्वतः पाठपुरावा केला. “बॅचलर्स इन स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ या पदवीला मान्यता मिळाल्याने देशातील क्रीडा नैपुण्याच्या परिसंस्थेमध्ये व्यावसायिता निर्माण होईल आणि 10 अब्ज डॉलर मुल्याच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही श्री.केदार यांनी सांगितले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात पहिल्या टप्प्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी, क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील ३ वर्षांचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन व क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम या संस्थांचे देखील सहकार्य मागितले आहे; जेणेकरुन एकत्रित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल असे श्री. केदार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *