महाराष्ट्रमुंबई

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

मुंबई, दि. 24 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 05 एप्रिल आणि दि. 07 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा दि. 04 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये बदल करण्यात येत आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल. तर, सोमवार दि. 07 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक/देवनागरी) मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता 07 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *