बीड जिल्ह्यात 27 कोरोना बाधित:राज्यात 6248 तर देशात 58077 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1417 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 27 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1390 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 6 बीड 3 धारूर 1 गेवराई 1 केज 6 माजलगाव 3 परळी 5 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात आज ६ हजार २४८ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तसेच मृत्यूसंख्याही कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ६ हजार २४८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १८ हजार ९४२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यात आज एकूण ७० हजार १५० रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ७६ लाख १२ हजार २३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के झाले आहे.
देशात कोरोनाचे ५८ हजार ७७ नवे रुग्ण
देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus cases) घट झाली आहे. तसेच मृत्यूंचे प्रमाणही (Covid deaths) कमी झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८ हजार ७७ नवे रुग्ण आढळून आले. तर ६५७ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १ लाख ५० हजार ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात ६ लाख ९७ हजार ८०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी रेट ३.८९ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ७ हजार १७७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
याआधीच्या दिवशी ६७ हजार ५९७ कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, १ हजार २४१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ६७ हजार ८८२ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. याआधीच्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ४ हजार २८१ ने घट नोंदवण्यात आली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.९५ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ४.४४ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्ग दर ६.५८ टक्के नोंदवण्यात आला होता.
परदेशातून येणाऱ्यांना आरटी-पीसीआरची सक्ती रद्द
विदेशातून येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर अहवाल (७२ तास वैधता) घेऊन येण्याची सक्ती केंद्र सरकारने रद्द केली आहे. कोविड संदर्भातील नवी मार्गदर्शक तत्वे सरकारने गुरुवारी जारी केली, त्यानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना देशात प्रवेश दिला जाणार आहे. सरकारने ओमायक्रॉन रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या देशांसाठीचे ‘ऍट रिस्क’ मार्किंग देखील हटविले आहे. भारतात आल्यानंतर प्रवाशांना ‘रँडम सॅम्पल’ देऊन विमानतळावरून बाहेर पडता येईल. एअर सुविधा पोर्टलवर ज्या प्रवाशांनी सेल्फ डिक्लरेशनच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहिती भरलेली आहे, तसेच आरटी-पीसीआर अहवाल किंवा दोन्ही डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले आहे, अशा प्रवाशांनाच विमान कंपन्या बोर्डिंगची परवानगी देतील.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)