ऑनलाइन वृत्तसेवा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन,भारताने ‘रत्न’ गमावले!

मुंबई- गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना जगभरात व्यक्त होत आहे.
९२ वर्षीय लतादीदींना यांना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोना व न्यूमोनियाची लागण झाल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. प्रकृती सुधारल्यामुळं त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणाही काढण्यात आली होती. मात्र, वय जास्त असल्यानं खबरदारी म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. कालपासून पुन्हा त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

असा सुरू झाला गायन प्रवास
लतादीदींनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली. ‘एक प्यार का नगमा है’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘एक राधा एक मीरा’ आणि ‘दीदी तेरा देवर दीवाना’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढविला होता.
लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९९९ मध्ये पद्मविभूषण आणि २००१ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २००९ मध्ये ‘ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *