पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस-राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत
कोरोनाची लाट ओसरत चालल्यामुळे पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालयाचे दार खुले होत आहे. राज्यातील महाविद्यालय १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अलीकडेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. पण, आता पालकांकडून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यास होकार दर्शवला आहे.
आता शाळा सुरू केल्या आहे. जवळपास सगळीकडे ज्युनिअर कॉलेज सुरू केले आहे. शाळा सुद्धा सुरू झाल्या आहेत. जालना शहरात सुद्धा लक्ष ठेवून आहोत. १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा आपला मानस आहे. आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याचा विचार करत आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.
तसंच, ‘विद्यार्थ्यांना जर कमी प्रमाणात कोरोनाची लागण झाली तर मुलांना कुठे लक्षणं दिसत नाही, लगेच ते बरेही होत आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा जालन्यात निर्णय घेतला आहे, असंही टोपेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्यात आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. तसंच राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे असंही नाही. त्यामुळे राज्यातील शाळांप्रमाणेच कॉलेजेसही सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.