आष्टीबीड

नगर बीड परळी रेल्वेमार्गावरील बारा डब्यांची रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी

नगर बीड परळी रेल्वेमार्गावरील आष्टी ते नगर रेल्वेची हायस्पीड चाचणी बुधवारी यशस्वीपणे पार पडली.
नगर बीड परळी रेल्वे मार्ग व्हावा ही जिल्ह्यातील जनतेची अनेक वर्षाची मागणी मंजूर झाली तरी प्रत्यक्षात त्यासाठी प्रत्येक रेल्वे अर्थ संकल्पात अत्यल्प तरतूद होत असल्याने हा मार्ग गती घेत नव्हता .

दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर , गोपीनाथ मुंडे यांच्यासह तत्कालीन खासदार रजनी पाटील यांनी यासाठी प्रयत्न केलेले होते .

मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि या कामाने गती घेतली . आता संपूर्ण मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले असून अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झालेले आहे .

नगर ते नारायणडोह दरम्यान 7 किमी अंतरावर 17 मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती . नंतर नगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या 15 किमी अंतरावर दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली .

मात्र नंतर लॉकडाऊन मुळे पुढील काम मंदावले . आणि आष्टी पर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला . कोरोनच्या दुसऱ्या लाटे नंतर रखडलेले काम सुरू झाले आणि सोलापूरवाडी धानोरा दरम्यान असलेल्या मेहकरी नदीवरील सर्वात उंच पुलाचे काम पूर्ण झाले .

दिनांक 9 डिसेंबर रोजी नगर कडा दरम्यान दोन डब्यांची रेल्वे गाडी आणून चाचणी झाल्यानंतर आता नगर ते आष्टी या साठ किलोमीटर अंतरावर हायस्पीड रेल्वे ( ताशी 144 किमी वेग ) चाचणी झाली आहे. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोलापूर वाडी ते आष्टी या 31 किलोमीटर रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच बारा डब्यांची रेल्वे गाडी धावली .

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मुंबईहुन अहमदनगर व त्यानंतर सोलापूरवाडी मार्गे आष्टीत दाखल झाले . पहिल्यांदाच बारा डब्यांची रेल्वे या मार्गावर धावणार असल्याने परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आनंद होता .

या हायस्पीड ट्रेन मधून रेल्वे सुरक्षा आयोगाचे मनोज अरोरा, मुख्य प्रभारी अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता (बांधकाम नगर) विजयकुमार रॉय, सोलापूरचे चंद्रभूषण सिंग व अहमदनगर येथील रेल्वेचे कार्यकारी अभियंता एस.सुरेश , विलास पैठणकर आदी अधिकारी उपस्थित होते,नंतर रेल्वे नगरकडे हायस्पीडने रवाना झाली . २६ जानेवारी पासून आष्टी , मुंबई रेल्वे सुरू होण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *