ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

नाईट कर्फ्यू,गर्दींसाठी कठोर नियम,लग्न आणि अंत्यविधींला मर्यादित उपस्थिती:केंद्राची राज्यांना नियमावली

मुंबई – कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता दिसत असल्यामुळे त्याचबरोबर देशातील अनेक भागांमध्ये ओमिक्रॉन आढळत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

या शिफारशींमध्ये जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाला रोखण्यासंबंधीची धोरणे आणि निर्बंधांचा उल्लेख आहे. नाईट कर्फ्यू, गर्दीवर बंदी आणि लग्नातील उपस्थिती कमी करण्यासंबंधी या शिफारशींमध्ये सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्वच राज्यांना पत्र पाठवले असून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत, असे सांगितले आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल, तर तिथे निर्बंध लावले जाऊ शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

स्थानिक स्थिती तसेच लोकसंख्या लक्षात घेता आणि सोबतच ओमिक्रॉनचा वेगाने होणारा संसर्ग लक्षात घेता राज्य आधीच प्रतिबंधात्मक उपाय आणि निर्बंध लावू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट सांगितले आहे.

सध्याच्या पुराव्यांनुसार आरोग्य मंत्रालयाने, ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत तीन पाट जास्त संसर्गजन्य असल्याचे अधोरेखित केले आहे. तसेच जिल्हास्तरावर निर्णय घेताना अत्यंत तत्परता आणि लक्ष असण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशातील अनेक भागांमध्ये अद्यापही ओमिक्रॉनसोबतच डेल्टा उपस्थित असल्यामुळे स्थानिक आणि जिल्हा स्तरावर दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, महत्वाचे निर्णय घेणे आणि कठोर तसेच त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई गरजेची असल्याचे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सांगितले आहे.

राज्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने नाईट कर्फ्यू, गर्दींसाठी कठोर नियम, लग्न आणि अंत्यविधींमध्ये कमी उपस्थिती, कार्यालये, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकींसाठी नियमावली अशा गोष्टी सांगितल्या आहेत.

यावेळी केंद्राने दारोदारी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची माहिती घेण्यासंबंधी सुचवलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टर इन्फेक्शनचे नमुने ताबडतोब INSACOG लॅबमध्ये पाठवले पाहिजेत, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन शोध घेणे, इतर व्य़ाधी असणाऱ्यांची चाचणी, रोज योग्य प्रमाणात आरटीपीसीआर चाचणी करणे आणि कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे. याशिवाय गृहविलगीकरणाची अंमलबजावणी होईल याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यांनी १०० टक्के लसीकरण होईल यासाठी जास्त प्रयत्न करावेत, असे यावेळी सुचवण्यात आले आहे. देशातील आकडेवारीच्या तुलनेत पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यांकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. गरज पडली तर घरोघरी जाऊन लसीकरण करा, असाही सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *