महाराष्ट्रमुंबई

पुढील चार दिवस पावसाचे: हवामान खात्याकडून ‘या’ 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट

मुंबई – कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात काही दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही धांदल उडाली आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य- उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याने आज एकूण 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

संबंधित जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान वेगवान वारा वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रात पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांसोबत मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण-पूर्ण गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भागात तीव्र पावसाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असणार आहे. पण इतरत्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्‍यता आहे. पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्‍यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *