बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तीन दिवस पावसाचा अंदाज
औरंगाबाद – मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, उद्या आणि गुरुवारी या तीन दिवसात मराठवाडा विभागातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
यामध्ये आज मराठवाडा विभागातील औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तर उद्या औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात आणि गुरुवारी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता कापूस पिकाची वेचणी लवकरात लवकर करून घ्यावी. तूर, ज्वारी, हरभरा, करडई, भाजीपाला पिकांमध्ये पाणी देणे तसेच फवारणी चे कामे पुढे ढकलावी. तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला व फळांची काढणी करून घ्यावी जेणेकरून वादळीवाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येईल.