यंदा शुभमंगलसाठी चक्क 63 विवाह मुहूर्त:मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त
पुणे – दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो; परंतु दोन वर्षांपासून करोनाचे सावट असल्यामुळे अनेक लग्नसमारंभ रद्द झाले. मात्र, यंदाच्या लग्नसराईत “लग्नाळू’ तरुणांसाठी चक्क 63 विवाह मुहूर्त असून “शुभमंगल सावधान’साठी यापैकीच एखादा मुहूर्त साधण्यासाठी वर-वधू पित्याची व “लग्नाळू’ तरुणांची लगबग सुरू होणार आहे. त्यात मे महिन्यात सर्वाधिक शुभ मुहूर्त असणार आहेत.
मुलीच्या घटत्या जन्मदरामुळे मुलांना लग्नासाठी वधू मिळणे अवघड झाले आहे. विशेषतः शहरी भागात लग्न जुळून येणे अवघड ठरत आहे, याउलट ग्रामीण भागात छोटा-मोठा रोजगार तसेच शेतकरी मुलांनाही लग्नासाठी “होकार’ देणाऱ्या मुलींची संख्या आता वाढू लागली आहे.
यामुळे शहरी भागात राहणाऱ्या “लग्नाळूं’ तरुणांना आता परजिल्ह्यात वधू शोधाव्या लागत आहेत. वधू शोधताना अटींची भली मोठी “लिस्ट’ आता राहिली नसून अगदी जातीपातीचा विचार न करताही परजिल्ह्यातील मुलींशी लग्नगाठ बांधण्यास “सुशिक्षित’ तरुण तयार होत आहेत.
वधू पित्याला कोणताही त्रास न देता अगदी लग्नाचा सर्व खर्च मुलाकडून केला जात आहे. इतकेच नाही तर वधुसाठी स्वखर्चातून दागदागिनेही करण्याची मानसिकताही तरुणांच्या कुटुंबीयांकडून पाहायला मिळत आहे.
उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी…
शहरातील नवरा पाहिजे, असे बहुतांश तरुणींना वाटत होते. गावात राहणाऱ्या मुलींना शहराची ओढ होती, त्यामुळे गावातील मुलींचे लग्न जमविणे वधू पित्यास अवघड ठरत होती. परंतु, करोनाच्या गेल्या दोन वर्षाच्या काळात विवाहाबाबत काही संकल्पना बदलल्या आहेत. करोनात भल्याभल्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. करोना काळात शहरात अनेकांचे हाल झाले, त्यांन गावची वाट धरावी लागली. त्यातुलनेत शेती असणाऱ्या तरुणांना फारसा काही फरक पडला नाही. याउलट करोनाकाळात शेतकरी कुटुंब खाऊन-पिऊन सुखी, असल्याचे चित्र होती. यातूनच आता उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी… असा विचार बदल असून शेतकरी तरुणांनाही लग्नासाठी “होकार’ मिळू लागला आहे, या बदलाचे सर्वत्र चांगले स्वागत होत आहे.
असे आहेत मुहूर्त
नोव्हेंबर -20, 21, 29, 30 डिसेंबर- 1, 7, 8, 9, 13, 19, 24, 26, 27, 28, 29 जानेवारी (2022) – 20,22, 23, 27, 29 फेब्रुवारी- 5, 6, 7, 10, 17, 19 मार्च- 25, 26, 27,28 एप्रिल- 15, 17, 19, 21, 24, 25 मे- 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 22, 25, 26, 27 जून- 1, 6, 8, 11, 13, 14, 15, 16, 18, 22 जुलै- 3, 5, 6, 7, 8,9 आशा तारखा आहेत